केदारनाथमध्ये ढगफुटी आणि भूस्खलन

मुसळधार पावसामुळे केरळमधील अनेक भागांमध्ये पूर आलेला असतानाच आता उत्तर भारतातही तशीच स्थिती निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे दिल्लीच्या अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. पाठोपाठ उत्तराखंडमध्येही अतिवृष्टी सुरू झाली आहे. केदारनाथला जाणाऱ्या मार्गावर लिनचोलीजवळ ढगफुटीची घटना घडली आहे. त्यामुळे काहीच क्षणात मंदाकिनी नदीची जलपातळी वाढली आहे. ढगफुटीमुळे ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. अनेक भागांमध्ये पाणी साचलं असलं तरी अद्याप कोणत्याही जीवितहानीचं वृत्त समोर आलेलं नाही. मात्र, केदारनाथला जाणारी पदयात्रा विस्कळीत झाली आहे. पदयात्रेच्या मार्गावरच ढगफुटी झाल्याने ५० ते २०० तीर्थयात्रेकरू अडकल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे.

या पदयात्रेतील मार्ग असलेल्या परिसरात भूस्खलन होऊन रस्त्याचा ३० मीटरचा भाग दुर्घटनाग्रस्त झाला आहे. केदारनाथला जाणारा पायी मार्ग दुर्घटनाग्रस्त झाल्याने या मार्गावरील दळणवळण पूर्णपणे ठप्प झालं आहे. स्थानिक प्रशासनाने मदतीसाठी एक बचाव पथक घटनास्थळी पाठवलं आहे.

केदारनाथमध्ये रात्रभर चालू असलेला मुसळधार पाऊस, लिनचोली व महाबली भागात झालेल्या भूस्खलनानंतर मंदाकिनी नदीपात्रात मोठे दगड पडल्याने नदी आता एखाद्या झऱ्याएवढी झाली आहे. गौरकुंडमधील गरम पाण्याचं कुंड वाहून गेलं आहे. मध्यरात्री गौरीकुंड व सोनप्रयाग परिसरातील लोक आरडाओरड करत धावत सुटल्याचं काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.

बचावकार्याला सुरुवात

दरम्यान, मुसळधार पावसाचं वृत्त ऐकल्यानंतर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आपत्ती व पुनर्वसन विभागाच्या सचिवांना फोन करून दुर्घटनाग्रस्त भागांमध्ये मदत व बचाव कार्य सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री सतत बचावकार्याबाबतची माहिती घेत आहेत. तसेच इतर संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना २४ तास अलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, केदारनाथ पदयात्रा अनेक ठिकाणी बंद आहे. पावसामुळे अनेक भागांशी संपर्क तुटला आहे. दळणवळणासह संपर्काचे मार्ग बंद आहेत. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

जिल्हा न्यायदंडाधिकारी सौरभ गहरवार यांच्या आदेशानुसार केदारनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. यात्रेकरूंना हेलिपॅड व इतर सुरक्षित स्थळी नेण्यात आलं आहे. एसडीआरएफच्या जवानांनी मंदाकिनी नदीची मोहीम सांभाळली आहे. नदीलगत राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हालवण्यात आलं आहे.

हे ही वाचा: आई खरंच काहीही करू शकते

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top