हा माझ्या आयुष्यातील सर्वांत ‘ कठीण काळ ‘; अभिनेत्रीचा खुलासा

अभिनेत्री प्रियांका चोप्राला बॉलिवूडमध्ये यश मिळवल्यानंतर हॉलिवूडमध्ये शून्यापासून सुरुवात करावी लागली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती या संघर्षाबाबत मोकळेपणे व्यक्त झाली. आयुष्यातील तो खूप कठीण काळ होता, असं ती म्हणाली.
बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्राने स्वत:च्या दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर हॉलिवूडमध्येही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. मात्र हॉलिवूडमध्ये कामाच्या संधी मिळवणं हे प्रियांकासाठी सोपं नव्हतं. प्रियांका जरी बॉलिवूडमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक असली तरी हॉलिवूडमध्ये तिला शून्यापासून सुरुवात करावी लागली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या हॉलिवूडच्या करिअरमधील कठीण काळाबद्दल खुलासा केला. ‘कॅवनॉघ जेम्स’च्या पॉडकास्टमध्ये प्रियांका तिच्या करिअरविषयी मोकळेपणे बोलली. हॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर ती तिथे कोणालाच ओळखत नव्हती. त्या इंडस्ट्रीत तिचे कोणी मित्र-मैत्रिणीही नव्हते. इतकंच नव्हे तर न्यूयॉर्क सिटीमध्येही तिच्या ओळखीचं कोणीच नव्हतं. अनेक संकटांचा सामना करत प्रियांका तिच्या ध्येयापर्यंत पोहोचली.

2017 मध्ये प्रियांकाने ‘बेवॉच’ या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. याविषयी ती म्हणाली, “हॉलिवूड इंडस्ट्रीत मी कोणालाच ओळखत नव्हती आणि कोणी मित्र किंवा मैत्रिणही नव्हती. माझ्यासाठी हे थोडंसं भीतीदायक पण होतं. न्यूयॉर्क शहरात माझ्या जवळचं कोणीच नव्हतं. त्यामुळे मला ते शहर अंध:काराने भरलेलं वाटायचं. मी जरी बॉलिवूडमध्ये टॉपची अभिनेत्री असली तरी हॉलिवूडमध्ये मला शून्यापासून सुरुवात करावी लागली होती. सुरुवातीच्या काळात हॉलिवूडमध्ये माझ्याशी मीटिंग करायलाही कोणी तयार नव्हतं. जेव्हा तुमच्याकडे दुसरा कोणता पर्याय नसतो, तेव्हा तुम्हाला परिस्थितीशी तडजोड करावी लागते. पण मी हार मानली नव्हती.”

प्रियांकाने याच मुलाखतीत बॉलिवूडमधील संघर्षाविषयीही खुलासा केला होता. “चित्रपटात एकाच्या गर्लफ्रेंडला भूमिका देण्यासाठी मला संधीला मुकावं लागलं”, असं तिने सांगितलं. “फिल्म इंडस्ट्रीमध्ये मी असंख्य नकार पचवले आहेत, तेसुद्धा असंख्य कारणांसाठी. मग त्या भूमिकेसाठी मी योग्य नसेन किंवा पक्षपात असेल किंवा मग एखाद्याच्या गर्लफ्रेंडला संधी द्यायची असेल. अशा अनेक कारणांसाठी मी नकार पचवला आहे. या सर्व गोष्टींतून मी कधीच बाहेर पडले,” असं ती पुढे म्हणाली.
प्रियांकाने अमेरिकन गायक निक जोनासशी लग्न केलं. त्यानंतर ती त्याच्यासोबत परदेशात स्थायिक झाली. प्रियांका आणि निक काही कामानिमित्त किंवा कौटुंबिक कार्यक्रमांनिमित्त भारतात येतात. काही दिवसांपूर्वीच होळीच्या निमित्ताने प्रियांका आणि निक हे दोघं त्यांची मुलगी मालती मेरीसह भारतात आले होते. यावेळी त्यांनी अयोध्येतील राम मंदिराचंही दर्शन घेतलं. चुलत बहीण मन्नारा चोप्राच्या वाढदिवसाच्या पार्टीलाही प्रियांका-निक उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top