भारतीय इतिहासातील पहिली महिला शिक्षिका आणि सामाजिक क्रांतीची अग्रदूत सावित्रीबाई फुले यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्यांनी केवळ महिलांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा केला नाही, तर समाजातील अज्ञान, जातीभेद आणि स्त्रियांवरील अन्यायाविरुद्ध लढा दिला. सावित्रीबाईंच्या कार्यामुळे आजच्या आधुनिक महिलांना स्वतंत्र अस्तित्व मिळविण्याचा मार्ग सापडला आहे.
शिक्षणाची सुरुवात आणि संघर्ष
सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील नायगाव येथे झाला. बालविवाह प्रथेनुसार, त्यांचे लग्न वयाच्या नवव्या वर्षी ज्योतिराव फुले यांच्यासोबत झाले. सावित्रीबाई शिक्षणाच्या संधीपासून वंचित होत्या, परंतु ज्योतिरावांनी त्यांना शिक्षण घेण्याची प्रेरणा दिली. शिक्षणासाठी त्यांनी प्रचंड संघर्ष केला. समाजाच्या विरोधाला तोंड देत त्यांनी स्वतः शिक्षण घेतले आणि इतरांसाठीही शिक्षणाची दारे उघडली.
पहिल्या शाळेची स्थापना
1848 साली पुण्यात सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा स्थापन केली. त्यावेळी मुलींना शिकविणे पाप मानले जात होते. सावित्रीबाईंना समाजाच्या विरोधाचा सामना करावा लागला; त्यांच्या अंगावर दगड, चिखल, शेण फेकले जात असे. परंतु त्यांनी आपला संकल्प सोडला नाही.
सामाजिक सुधारणा
सावित्रीबाई फुले यांनी फक्त शिक्षणाचाच प्रसार केला नाही, तर समाजातील विधवांच्या पुनर्विवाहाचा प्रचार केला. त्यांनी ‘बालहत्याप्रतिबंधक गृह’ स्थापन करून गर्भवती विधवांना आधार दिला. जातिभेद आणि अस्पृश्यतेच्या विरोधात लढा देताना त्यांनी समतेचा संदेश दिला.
सावित्रीबाईंचा वारसा
सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाचे आणि स्वतंत्र विचारांचे द्वार उघडले. आजच्या युगात जिथे जिथे महिलांचे कर्तृत्व दिसते, तिथे सावित्रीबाईंचे कार्य दिसते. त्यांनी महिलांना केवळ शिक्षण दिले नाही, तर आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकारही दिला.
अभिवादन
आज सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करताना, त्यांच्या कार्याची आठवण करून देणे गरजेचे आहे. सावित्रीबाईंनी दाखवलेल्या मार्गावर चालूनच समाज अधिक प्रगत आणि समतामूलक होईल.
साडीवर पडलेल्या शेणाचंच नव्हे तर देहाचंही खत झालं
आणि इतक्या वेली फुलल्या की प्रत्येक मुलीचं फुल झालं…..
जिथं जिथं कर्तृत्ववान, शिकलेल्या मुली दिसतात
तिथं तिथं सावित्रीबाई तुमचं अस्तित्व दिसतं…..
अंधारातून प्रकाशाकडे ज्यांनी महिलांना पोहचवलं,
चूल आणि मूल यापलिकडे ही जग आहे ज्यांनी दाखविलं…..
अशा भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन !
🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐