इस्रायल-हिज्बुल्लाह संघर्षः
इस्रायलमध्ये काल एका बाजूला देशातील नागरिकांनी हल्ल्याच्या वर्षपुर्तीच्या शोकसभांमध्ये भाग घेतला, तर दुसऱ्या बाजूला, शेजारील देश लेबनानमधून हिज्बुल्लाह या शक्तिशाली संघटनेकडून इस्रायलवर तब्बल 130 रॉकेट्स डागण्यात आले. याला प्रत्युत्तर देत इस्रायलने हिज्बुल्लाहच्या विविध तळांवर प्रचंड हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये इस्रायलने 100 फायटर जेट्सचा वापर करून लेबनानमधील हिज्बुल्लाहच्या 120 तळांना लक्ष्य केले. यामध्ये हिज्बुल्लाहच्या मिसाइल रॉकेट फोर्स, इंटेलिजन्स युनिट्स तसेच रादवान फोर्स या तळांचा समावेश होता.
इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणांनी लेबनानमधील नागरिकांना समुद्र किनाऱ्यांपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. आयडीएफने लेबनानच्या नागरिकांना हवाई हल्ल्यांची पूर्वसूचना दिली असून, अवली नदीच्या दक्षिणेकडील भागात आणि किनाऱ्याजवळील क्षेत्रांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. आयडीएफने उत्तर इस्रायलला ‘क्लोज्ड मिलिटरी झोन’ म्हणून घोषित केलं आहे, ज्या अंतर्गत मिलिटरी कारवाईसाठी बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंदी आहे.
7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने दक्षिण इस्रायलवर मोठा हल्ला केला होता, त्यानंतरच्या वर्षभरात इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षाचा ताण कायम राहिला आहे. याच हल्ल्याच्या वर्षपुर्तीनिमित्त इस्रायलने शोकसभांचे आयोजन केले होते. परंतु हिज्बुल्लाह आणि हमासने याच दिवशी हल्ले करण्याचा निर्धार केला. इस्रायलच्या हायफा शहराला टार्गेट करत हिज्बुल्लाहने रॉकेट्सचा मारा केला, परंतु इस्रायलच्या आयरन डोम मिसाइल संरक्षण प्रणालीने अनेक रॉकेट्स हवेतच नष्ट केली.
गेल्या वर्षभरात इस्रायलने गाझा पट्टीत केलेल्या कारवाईमुळे हमासची रॉकेट डागण्याची क्षमता लक्षणीय कमी झाली आहे, परंतु त्यानंतरही हमासने इस्रायल विरोधात युद्ध सुरु ठेवण्याचा संकल्प केला आहे. यामध्ये लाखो लोकांच्या जीविताचा प्रश्न उपस्थित झाला आहे, ज्यात दोन्ही बाजूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
इस्रायलने हिज्बुल्लाहच्या सैन्य तळांवर केलेल्या हल्ल्यात ‘कमांड एंड कंट्रोल’ युनिट्स तसेच त्यांच्या फायरिंग क्षमतेला नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.